प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी आज आपल्या पदाची सूत्रे विधिवत स्वीकारली. पदग्रहणापूर्वी त्यांनी माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर वाजतगाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने त्या नगरपरिषद कार्यालयात दाखल झाल्या. रसिकलाल धारिवाल सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यास म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, मनीषा कटके, सुभाष पवार, रवींद्र धनक, प्रकाश जगताप, सुभाष जगताप, रविंद्र काळे आणि शरद कालेवार उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर शहराचा कायापालट करण्यासाठी रचनात्मक विकासाचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी शहराच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली. माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण यांनी प्रास्ताविक केले, तर अभिजित पाचर्णे यांनी आभार मानले. “आगामी काळात पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार असेल. नगराध्यक्षपद ही केवळ सत्ता नसून, ती सेवा करण्याची संधी आहे. आगामी काळात शुद्ध पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या कामांना प्राधान्य दिले जाईल.” – ऐश्वर्या पाचर्णे, शिरूर नगराध्यक्ष