प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूर तालुक्याच्या बेट भागात चांडोह गावच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात सर्वाधिक ९ वर्षे वयोमान असलेला नर बिबट्याला बुधवारी (दि. १०) पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट घटनांसाठी हॉटस्पॉट ठरलेल्या पिंपरखेड व चांडोह परिसरात मागील चोवीस तासांत एकूण तीन बिबटे जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत वनविभागाकडून एकूण २४ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.चांडोह परिसरात शेतकरी दत्ता गोविंद वडणे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नऊ वर्षे वयाचा बिबट जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून या बिबट्याचा मुक्त संचार होता, तसेच त्याने पशुधनावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. याचबरोबर, पिंपरखेड (ता. शिरूर) येथील गावठाण व स्मशानभूमी परिसरात वीटभट्टी व्यावसायिक संतोष सोनवणे यांनी बिबट्याचा मुक्त संचार पाहिल्यानंतर नागरिकांनी वनविभागाला कळवले होते. त्यानुसार लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि. ९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सात वर्षीय नर बिबट्यालाही जेरबंद करण्यात आले. या भागात जांबूत, पिंपरखेड, फाकटे आणि चांडोह परिसरात सध्या ३२ पिंजरे कार्यान्वित आहेत. ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसेल, त्या त्या ठिकाणी पिंजरे लावून हे बिबट जेरबंद करण्यात येतील, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते व बेस कॅम्प जवान हे कारवाया करत आहेत.