प्रभात वृत्तससेवा रांजणगाव गणपती – वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, पिंपरी दुमाला येथे स्वखर्चातून लोखंडी संरक्षक जाळी बसवून देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला आहे. पिंपरी दुमाला शाळेत अलीकडेच बिबट्या आढळल्याने पालक चिंतेते होते. शाळेच्या संरक्षक भिंतीवर काही ठिकाणी लोखंडी जाळी नसल्यामुळे बिबट्या शाळेत घुसण्याची शक्यता पाचुंदकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, कोणत्याही विलंबाशिवाय स्वखर्चातून शाळेच्या परिसरात मजबूत लोखंडी संरक्षक जाळी बसवून दिली. यामुळे शाळेच्या सुरक्षिततेत मोठी वाढ झाली असून, पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.नुकत्याच आयोजित सोहळ्यात या संरक्षक जाळी बसविण्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाती पाचुंदकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काळातही आवश्यक ते सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर, आशा शेलार, शरद खळदकर, शरद दुर्गे, प्रकाश चिखले, तेजश्री चिखले, अभिषेक शेळके, सुनील सोनवणे,अर्जुन शेळके, माणिक म्हाळसकर, बबन चिखले, कांताराम शिंदे आदी उपस्थित होते.