प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही अवघ्या काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती अत्यंत दर्जाहीन आणि निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मुख्य मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि रुग्णवाहिका यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, रस्ता पुन्हा उखडून खडी वर आल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याच्या घटनाही या ठिकाणी घडत आहेत. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाले की काय, असा संशय आता वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक नितीन थोरात यांनी सांगितले की, दोनदा खड्डे भरूनही निकृष्ट साहित्यामुळे रस्ता पुन्हा खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याप्रकरणी कामाची चौकशी करून, शिरूर येथे कर्तव्यावर असूनही पुणे येथे वास्तव्य करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी संघटनांनी केली आहे. रस्ता त्वरित नीट न झाल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.