प्रभात वृत्तसेवा जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या संरक्षणासाठी ५७.५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निधीतून गावठाण शाळा, अंगणवाड्या आणि वस्तीशाळांभोवती संरक्षक भिंती बांधणे, तसेच संरक्षण भिंतींवर काटेरी तार लावणे अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याने पालक आणि शिक्षक चिंतेत होते.या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरपंच राजेंद्र दाभाडे आणि ग्रामस्थांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संरक्षक भिंतींसाठी निधीची मागणी केली होती. दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने या मागणीची दखल घेत, त्यांच्या आमदार निधीतून हा निधी मंजूर केला आहे.सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले की, या निधीमुळे कामे तातडीने पूर्ण होऊन शाळा परिसर सुरक्षित होईल. ज्यामुळे बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी शाळेच्या आवारात प्रवेश करू शकणार नाहीत आणि मुले सुरक्षित राहतील. निधीचा तपशील असा आहे गावठाण शाळा संरक्षक भिंत (२१ लक्ष), गावठाण प्राथमिक शाळा दुरुस्ती (७ लक्ष), दत्तवाडी अंगणवाडी संरक्षक भिंत (१० लक्ष), ढोमेमळा शाळा संरक्षक भिंत (८ लक्ष), कोयमहाल वस्ती पारगाव रोड शाळा संरक्षक भिंत (६ लक्ष), दाभाडेमळा संरक्षक भिंतीवर काटेरी तार (४ लक्ष) आणि बोऱ्हाडेवस्ती अंगणवाडी संरक्षक भिंतीवर काटेरी तार (१.५० लक्ष).