पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागात मंगळवारी (२० जानेवारी २०२६) मोठी राजकीय उलथापालथ घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पोपटराव गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी कापली गेल्याने नाराज झालेल्या राजेंद्र गावडे यांनी भाजपची वाट धरली, ज्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. टाकळी हाजी गटातील गावडे कुटुंबाचे पारंपरिक वर्चस्व धोक्यात गेल्या अनेक दशकांपासून टाकळी हाजी आणि बेट परिसर हा गावडे कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. ६४ वर्षांहून अधिक काळ या जिल्हा परिषद गटावर गावडे कुटुंबाचे वर्चस्व होते. माजी आमदार पोपटराव गावडे यांचा शब्द उमेदवारी देताना अंतिम मानला जात असे. मात्र, अलीकडच्या काळात दामूशेठ (दामू अण्णा) घोडे यांनी या भागात आपला प्रभाव वाढवत गावडे कुटुंबाला जोरदार आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे अजित पवार गटात सामील झाले होते, तर त्यांचे राजकीय विरोधक दामू अण्णा घोडे शरदचंद्र पवार गटात दाखल झाले. जनसंपर्क आणि संघटन बळाच्या जोरावर दामू अण्णा घोडे यांनी टाकळी हाजी गटात आपले स्थान मजबूत केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टाकळी हाजी गट शरद पवार गटाकडे देण्याचा निर्णय झाला. यामुळे राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापली गेली आणि गावडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. समर्थकांच्या आग्रहानुसार भाजपमध्ये प्रवेश राजेंद्र गावडे गेल्या अनेक महिन्यांपासून टाकळी हाजी गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते आणि राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, अचानक निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या गावडे समर्थकांनी टाकळी हाजी येथे बैठकीत उघड नाराजी व्यक्त केली. “इतकी वर्षे तयारी करूनही अचानक डावलले जात असेल तर पर्याय शोधावा लागेल,” अशी भूमिका समर्थकांनी मांडली. अखेर समर्थकांच्या आग्रहानुसार राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णायक निर्णय घेतला. पुण्यातील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे, भगवान शेळके, अशोक माशेरे यांनीही उपस्थिती लावली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, शिरूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित यांच्यासह अनेक सरपंच, चेअरमन आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत या पक्षप्रवेशामुळे टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून आगामी निवडणुकीसाठी राजेंद्र गावडे यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गावडे कुटुंबाला घरातीलच तिकीट कापले गेल्याने मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता या प्रतिष्ठेच्या लढतीत दामू अण्णा घोडे यांचा वरचष्मा राहणार की भाजपच्या बळावर राजेंद्र गावडे पुन्हा आपली पकड मजबूत करणार, हे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. या घडामोडींमुळे शिरूर तालुक्यातील निवडणूक वातावरण तापले आहे.