प्रभात वृत्तसेवा शिरूर – टाकळी हाजी गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना (उबाठा) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बेट भागातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णतः बदलले असून, येणारी लढत आता तिरंगी होणार की, चौरंगी? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. बाळासाहेब डांगे गेल्या अनेक महिन्यांपासून या गटातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, याच काळात राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादीकडून आपला प्रचार अधिक तीव्र केल्याने डांगे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर डांगे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत जाऊन शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केल्याने निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे दावेदार दामू अण्णा घोडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या चित्रानुसार शिवसेना (उबाठा) पक्षातून बाळासाहेब डांगे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र गावडे, राष्ट्रवादी(शप)कडून दामू अण्णा घोडे आणि शिवसेनेकडून डॉ. सुभाष पोकळे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही लढत चौरंगी होण्याची दाट शक्यता असून, ही निवडणूक केवळ स्थानिक नसून संपूर्ण शिरूर तालुक्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.