जांबूत – शिरुर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालेले तीन निष्पाप जीवांचे दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर वाढलेल्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलली आहेत. या साखळीतील यश म्हणून, आज गुरुवारी (दि.०४) रोजी पहाटेच्या सुमारास पिंपरखेड (ता.शिरुर) येथील आंबेवाडी परिसरात एका नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा बिबट्या मागील आठवडाभरापासून पशुधनावर हल्ले करत होता आणि पिंजऱ्याला दोन वेळा हुलकावणी देऊन भक्ष फस्त करत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शेतकरी रामदास देवका बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा सुमारे पाच वर्षीय नर बिबट्या अडकला. या बिबट्याला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रोहन बोंबे यांच्या मृत्यूनंतर वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याला दुसऱ्याच दिवशी ठार करण्यात आले होते. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सहाय्याने काही बिबट्यांना बेशुद्ध करण्यात आले, तसेच विविध भागात पिंजरे लावून अनेक बिबट्यांना बंदिस्त करून त्यांची माणिकडोह (जुन्नर) येथे रवानगी करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांत 20 बिबटे जेरबंद- सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याला माणिकडोह (जुन्नर) येथे रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांत पिंपरखेड, जांबूत, फाकटे (ता.शिरुर) या गावांतून सुमारे २० बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे. बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यांचा मानवी वस्तीमधील वावर कमी करण्यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाते यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सूचनेनुसार शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर आणि महेंद्र दाते हे या सर्व कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.