प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या प्रचार जोरदार सुरू झाला असून, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वतः मैदानात उतरून काढलेल्या पदयात्रेला शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पदयात्रेची सुरुवात बाजार समिती प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे, सर्व प्रभागांतील उमेदवार, महिला कार्यकर्त्या आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहरातील पालखी मार्ग, कापड बाजार, राम आळी, मारूती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सोनार आळी अशा प्रमुख भागांतून धडाक्यात काढलेल्या या पदयात्रेने वातावरणात निवडणूक रंगत आणली. नागरिकांनी घरातून बाहेर येत कार्यकर्त्यांचे स्वागत करत उत्साहाने प्रतिसाद दिला. या पदयात्रेत आमदार माऊली कटके यांसह रवी काळे, शशिकांत दसगुडे, जाकीर खान पठाण आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.कटके यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत ऐश्वर्या पाचर्णे यांना प्रचंड समर्थन देण्याचे आवाहन केले. शहरातील वातावरण निवडणुकीच्या रंगात रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दमदार पदयात्रेमुळे ऐश्वर्या पाचर्णे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे. “शिरूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार कटके म्हणाले, ‘‘शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नगराध्यक्षपदी ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि सर्व २४ नगरसेवकांना विजयी करून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, याची मी हमी देतो.” शिरूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग पदयात्रेदरम्यान महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी तसेच युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे स्वागत केले. प्रचारफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आणि संघटनशक्ती ठळकपणे जाणवली.