प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूरच्या बेट भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांच्या जीवाला चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा घोर लावला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने गावठाण आणि बोंबेमळा वस्तीवर धुमाकूळ घालून चोरीचे प्रयत्न केले. मात्र, नागरिकांच्या प्रसंगावधान व सतर्कतमुळे चोरीच्या घटना टळल्या. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गुरुवारी ( दि.२५) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंपरखेड गावठाणातील रूपचंद भगवानदास गांधी यांचे दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यात असलेली चिल्लर रक्कम चोरून नेली. त्याच शेजारील असलेल्या प्रवीण गांधी यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटले. शेतकरी बबन गाव शेती तसेच सुभाष नवगिरे यांचे घराचे कडी कोयंडे तोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. यावेळी जाग आलेल्या गाव शेती कुटुंबीयांनी आवाज दिल्यानंतर चोरट्यांनी तिथून पलायन केले. नंतर त्यांनी एक किलोमीटर अंतरावर बोंबेमळा येथील मारुती भाऊसाहेब बोंबे यांच्या बंगल्याचा दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तीन ते चार जण लोखंडी रॉड असल्याचे बोंबे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, त्यांनी घरातील दोन कपाटे उचकटून टाकण्याचा प्रयत्न केला. अशातच मारुती बोंबे यांना जाग आल्यानंतर त्यांनी पत्नी झुंबरबाई व मुलगा राजेंद्र यांना आवाज दिला. शेजारील रहिवाशी गणेश बोंबे, हिरामण बोंबे, संतोष येवले यांच्याशी संपर्क साधला. घरातील सर्वजण जागे झाल्याची कुणकूण लागताच चोरट्यांनी देवगाव (ता. आंबेगाव) रस्त्याच्या बाजूने उसाच्या शेतामधून पळ काढला. चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.