प्रभात वृत्तसेवा शिरूर – सरदवाडी (ता. शिरूर) आणि शिरूर शहरातील जोशीवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना फसवून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवल्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. सायंकाळच्या सुमारास घरासमोर फेरफटका मारणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दुचाकीस्वारांनी अंदाजे चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पहिली घटना सरदवाडी येथील न्हावरा फाटा परिसरात घडली. रोहिणी सरोदे या घरासमोर चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारत संभाषणात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच शिरूर शहरातील जोशीवाडी येथे रंजना मेंगवडे या महिलेलाही याच पद्धतीने गाठून त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच नागरिकांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळांचे पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, महिलांनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.