Shiroli Budruk Yatra : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी माता यात्रेची सांगता कुस्त्यांच्या आखाड्यांनी, तर दावल मालिक बाबा यात्रेची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने पार पडली. यात्रा कालखंडामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या कालखंडात ह. भ. प हनुमान महाराज तांबे पैठण, प्रकाश महाराज साठे बीड, जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली, महादेव महाराज राऊत बीड, प्रशांत महाराज मोरे देहूकर, सचिन महाराज पवार पुणे, तुकाराम महाराज मुंडे शास्त्री परळी तर १८ मार्च रोजी ह. भ. प योगीराज महाराज गोसावी पैठण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. दि. १९ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ वाजता हार तुरे व आरती, ८ वाजता देवाचे भराड, संध्याकाळी ५ वाजता काठीचे भजन, ७ वाजता काठीची मिरवणूक तळी भंडार, ८ वाजता पालखीची मिरवणूक तर रात्री १० वाजता आनंद जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वा. भव्य कुस्त्यांचा आखाडा झाला. यावेळी अर्जुन बाबुराव थोरवे यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. कुस्तीच्या आखाड्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, पुणे, नगर, सातारा येथील मल्लांनी भाग घेतला. सुमारे ५० ते ६० कुस्त्या पार पडल्या. शेवटची कुस्ती पिंपळवंडी येथील राहुल फुलमाळी तर कोपरगावचा दिपक सांबर यांच्यात झाली. यामध्ये राहुल फुलमाळी याने दिपक सांबर याला चिटपट करून ५ हजार इनाम मिळवला. यावेळी पंच म्हणून विलास कदम, जालिंदर ढमाले, सुधीर देवणे, गुलाब थोरवे, जयसिंग थोरवे, पोलीस पाटील अमोल थोरवे, शांताराम भुजबळ यांनी काम पाहिले प्रमुख उपस्थिती म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे, सर्व ग्रा. प. सदस्य, बाळासाहेब विधाटे, प्रसाद थोरवे, प्रथमेश थोरवे, नितीन विधाटे, तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्नील रोकडे, योगेश हांडे, अँड संजय उकिर्डे, सचिन थोरवे, नितीन पंडित, नंदकुमार शेरकर, अभिजीत शेरकर, वैभव शेरकर, दिपक थोरवे, दत्ता बोऱ्हाडे उपस्थित होते. या आखाड्याचे सूत्रसंचालन गणेश राऊत सर यांनी केले. दि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा दावल मालिक बाबा यात्रेनिमित्त सकाळी ७.३० वा मांडव डहाळे, ९ वाजता देवाची पूजा त्यानंतर प्रसाद वाटप झाले. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.