ओझर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी माता यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री भैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताह व समस्त ग्रामस्थ मंडळ शिरोली बुद्रुक यांनी दिली. सप्ताहाची सुरुवात ११ मार्च रोजी सकाळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व रायगडचे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच ह.भ.प मुरलीधर भाऊ थोरवे यांच्या शुभहस्ते विना पूजन करून होणार आहे. सप्ताहाच्या कालखंडात ह.भ.प हनुमान महाराज तांबे. पैठण, प्रकाश महाराज साठे बीड, जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली, महादेव महाराज राऊत बीड, प्रशांत महाराज मोरे देहूकर, सचिन महाराज पवार पुणे, तुकाराम महाराज मुंडे शास्त्री परळी तर १८ मार्च रोजी ह.भ.प योगीराज महाराज गोसावी पैठण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून त्यानंतर काल्याचा महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सप्ताह कालखंडामध्ये ह.भ.प डॉ. गजानन महाराज काळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. याच कालखंडात पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते १० पारायण, दुपारी १ ते ४ नियमाचे भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ७ ते ९ कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर हनुमान भजन मंडळ नेतवड, मुक्तादेवी भजन मंडळ आलमे, हनुमान प्रसादिक भजन मंडळ धालेवाडी, मार्तंड भजन मंडळ तेजवाडी, अंबिका भजन मंडळ शिरोली बुद्रुक, भोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ आलमे अमृतनाथ स्वामी भजनी मंडळ निरगुडे यांचा जागर होणार आहे. रोज रात्री कीर्तनानंतर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ वाजता हार तुरे व आरती, ८ वाजता देवाचे भराड, संध्याकाळी ५ वाजता काठीचे भजन, ७ वाजता काठीची मिरवणूक तळी भंडार ८ वाजता पालखीची मिरवणूक, तर रात्री दहा वाजता आनंद जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सादर होणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ हजेरी दुपारी १२ वा. गाव हिशोब बैठक सायंकाळी ५ वा. भव्य कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा दावल मालिक बाबा यात्रेनिमित्त सकाळी ७.३० वा मांडव डहाळे नऊ वाजता देवाची पूजा त्यानंतर प्रसाद वाटप व रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सप्ताहाचा व यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ शिरोली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे