प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – येथील मोती चौक परिसरात असलेल्या पुरातन गोविंद महाराज मंदिरच्या इमारतीच्या जागेवर नव्याने सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या बांधकामात गंजलेले स्टील वापरले जात असल्याचा आणि भविष्यात पार्किंग व लिफ्टची सोय नसल्यामुळे अडचणी निर्माण होणार असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. गोविंद महाराज यांनी शिक्रापूर गाव तसेच ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर वसवले आहे. त्यांच्या मंदिराच्या जागेत अनेक वर्षांपासून अंगणवाडी व पोस्ट ऑफिस सुरू होते. सध्या या जागेवर तीन मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्यामध्ये पोस्ट ऑफिस व सिटी सर्व्हे ऑफिस होणार आहे. तसेच स्वच्छता गृह देखील उभारण्यात येणार आहे. मात्र, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि पार्किंगची सोय नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अक्षय मांढरे, सुरज चव्हाण यांच्यासह नागरिकांनी याबाबत पंचायत समितीकडे तक्रार करत सदर बांधकाम तातडीने थांबवून ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी विनंती केली आहे. पाठपुराव्यासाठी सामूहिक सही मोहीम शिक्रापूर येथील गोविंद महाराज इमारतीच्या बांधकामात गंजलेले स्टील वापरले जात असल्याने तसेच पार्किंग नसल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी सामूहिक सही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये दोनशे नागरिकांनी सह्या करून पाठींबा दर्शवला असून, स्थानिकांनी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.