प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना बिबट्यांपासून संरक्षण देण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक आणि सणसवाडी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथकांची नियुक्ती केली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि अमृत शिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाने कोरेगाव भीमा परिसरात विशेष नियोजन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी सोपान अनासुने, प्रमोद पाटील आणि बिबट शीघ्र कृती दलाचे पथक वाहनांसह परिसरात तैनात करण्यात आले आहे. ज्या भागात बिबट्यांचे दर्शन झाले आहे, अशा आपटी आणि सणसवाडी भागात आधीच पिंजरे लावण्यात आले असून, आपत्कालीन स्थितीसाठी काही अतिरिक्त पिंजरे सज्ज ठेवण्यात आले आहेत.विजयरणस्तंभ परिसरात येणाऱ्या समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. वनविभागाचे पथक रात्रभर परिसरात गस्त घालणार असून, नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शौर्यदिनाच्या सोहळ्यात कोणतीही वन्यजीव दुर्घटना घडू नये, यासाठी वनविभागाची ही यंत्रणा १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सतर्क राहणार आहे.