प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – 1 जानेवारी रोजी शौर्य दिनासाठी येणा-या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने पोलिस प्रशासन काम करणार असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसुरक्षा दलाच्या सहाय्याने पोलीस प्रशासन 24 तास गस्त घालणार आहे अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत राजेंद्र पन्हाळे बोलत होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, पोलीस पाटील दादासाहेब काळभोर, प्रियांका भिसे, मिलिंद कुंजीर, समीर जाधव, सोनाली शिवरकर, लोणी काळभोरचे ग्रामविकास आधिकारी एस एन गवारी, थेऊरचे ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संजय भालेराव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्षसूर्यकांत गवळी, बी जी घाटे, बामसेफचे श्रीकांत ओव्हाळ, भारतीय बौद्ध महासभा, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र कदम, पूर्व हवेली तालुका अध्यक्ष विजय गायकवाड, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट, संजय गायकवाड, विनायक कांबळे, प्रल्हाद कांबळे, दिगंबर जोगदंड, दीपक आढाळे, ड सुजित कांबळे, अमोल टेकाळे, प्रकाश भिसे, गणेश थोरात, स्वाती थोरात, अभिजित पाचकुडवे, नागसेन ओव्हाळ, विजय गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीत भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याबाबत विशेष खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला. शौर्य दिनानिमित्त येणा-या नागरिकांना पीएमटी बससेवा, पिण्याचे पाणी, नाश्ता, रस्त्यावरील पथदिवे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृह, पोलीस बंदोबस्त, सोशल मीडियावर लक्ष, स्वयंसेवक, वैद्यकीय सेवा आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.