प्रभात वृत्तसेवा कोरेगाव भीमा/शिक्रापूर – पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे १ जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंचा भीमसागर लोटला होता. हातामध्ये निळे झेंडे आणि मुखी जय भीमची घोषणा देत आलेल्या अनुयायांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे हा ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला. विजयस्तंभ परिसरात १ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईच्या वातावरणात २०८ व्या शौर्यदिनास जल्लोषात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर आणि माजी आमदार प्रकाश गजभिये यांसह अनेक मान्यवरांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस महासंचालक सुनील फुलारे आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कडाक्याची थंडी आणि दुपारचे कडक ऊन असूनही भीमसैनिकांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली. गर्दीचा ओघ पाहता पोलिसांनी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्या होत्या, तसेच काही वेळा व्हीआयपी गेटमधूनही अनुयायांना सोडण्यात आले. यावर्षी सुमारे १५ ते २० लाख भीमसैनिकांनी हजेरी लावली असून, समता सैनिक दलाच्या दोन हजार जवानांनी गर्दीचे नियोजन केले. महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने देण्यात आलेली मानवंदना हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघ आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.