प्रभात वृत्तसेवा बारामती – नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत विकासकामावर नाही तर पैसे, निधीवर मते मागितली जात आहेत. पैसे किती द्यायचे, यासाठी सध्या चढाओढ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठिकठिकाणी गट झाले आहेत. पैसे, निधीवर मत मागितली जात आहेत, ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक निवडणुकांबाबत परखड भाष्य करीत महायुतीच्या नेत्यांना फटकारले. पवार यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीत पैसा, उमेदवारांवर दबाव, निधींबाबत केलेले वादगस्त वक्तव्य आदी मुद्द्यांवर बोट ठेवत महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचयातींसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात महायुतीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. या सभांमध्ये नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी केली जात असून, लोक आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणाही केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत, माळेगाव येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य आदींवर शरद पवार यांनी बोट ठेवत टीकास्त्र सोडले.प्रचार सभांमध्ये विकास निधी हवा असेल तर आपला उमेदवार निवडून द्या, असे थेट आवाहन नेत्यांकडून केले जात आहेत. यावरच शरद पवार यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार होत असलेल्या विधानांचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. या निवडणुकीत एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षासोबत जात आहे. पहिल्यांदाच अनेक ठिकाणी गट दिसून येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीत एकवाक्यता नाही, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.