Sharad Pawar – मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ‘माझं नाव घ्यायचा काय संबंध, या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून होणाऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर अशी काही चर्चा सुरू असती तर अजित पवार यांनी भाजपाशी चर्चा केली असती असे विधान केले होते. बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या या विधानावर शरद पवारांनी पलटवार केला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करीत त्यांना बोलण्याचा काय अधिकार, असा प्रति सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.बारामती येथे पत्रकारांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादी विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, हे मला समजले नाही. सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, मला माहिती नाही. आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलीनीकरणावर चर्चा करीत होते. सध्या विलीनीकरणावर राजकीय चर्चा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या स्मारकाबाबत माहिती नाही ते म्हणाले की, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, त्यांना संधी दिली हा आनंद आहे. शपथविधीबाबत मला भाष्य करायचे नाही. अजित पवार यांच्या स्मारकाबाबत मला माहिती नाही. मी ते वर्तमानपत्रामध्ये वाचले. परंतु मला काही कल्पना नाही. ज्या संस्थेच्या जागेची चर्चा लोकांनी केली आहे. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला ठाऊक असले पाहिजे. अद्याप त्याबाबत आम्ही चर्चाही केली नाही. आम्ही संस्थेचे सर्व एकत्रित बसून त्यावर चर्चा करू. त्यामुळे आज अजित पवारांच्या स्मारकावर भाष्य करणे योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले. अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. संजय राऊत आणि इतर काही नेत्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली. त्यावरही शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत फार सुरुवातीला मी बोललो आहे. जोपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही. तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही, असे शरद पवार यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितले.