प्रभात वृत्तससेवा पिरंगुट – भोर – मुळशी – राजगड या तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सदर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोर – मुळशी – राजगड (वेल्हे) विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत शेकडो पाणीपुरवठा योजना मंजूर व सुरू केलेल्या आहेत. सदरपैकी काही योजना पूर्ण झाल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक कामे अपूर्ण अवस्थेत प्रलंबित आहेत. याशिवाय काही ठिकाणी कामे पूर्ण न होता ठेकेदारांना जादा बिलांचे देयक अदा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काही कामांमध्ये निकृष्ट दर्जा, अनियमितता, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याची दिसून येत आहे. परिणामी संबंधित नागरिकांना अपेक्षित पाणीपुरवठा मिळत नाही, ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे.भोर, मुळशी, राजगड (वेल्हे) तालुक्यातील सर्व जल जीवन मिशन योजनांची सखोल चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यास ठोस निर्देश द्यावेत. तसेच निकृष्ट व अनियमित कामांवर दंडात्मक कारवाई करावी आणि जादा देयक व अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आमदार शंकर मांडेक यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. “आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात भोर विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशनच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे करणार आहे.” – शंकर मांडेकर, आमदार भोर-राजगड-मुळशी