प्रभात वृत्तसेवा सासवड – निळुंज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून गावातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी माजी मंत्री व आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी नियोजन समिती सदस्य रमेश इंगळे यांनी केले.बेलसर- निळुंज रोड ते शिवरकर वस्ती या १५ लाख रुपये मंजूर निधी असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रमेश इंगळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा रस्ता वस्ती परिसरासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे नागरिकांना वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या रस्त्याचा थेट लाभ मिळणार असल्याचे इंगळे यांनी नमूद केले. गावातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. निळुंज व वाळुंजचा परिसर हा शेतीप्रधान भाग असल्याने रस्ता झाल्यानंतर शेतमाल वाहतूक सुलभ होऊन उत्पादन खर्चात बचत होईल. बाजारपेठेशी जोडणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकासकामांचा वेग वाढला असून निळुंज गावही त्या विकास प्रवाहात अग्रेसर राहील, असे इंगळे यांनी सांगितले. यावेळी रिसे पिसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश मुळीक, सरपंच अश्विनी बनकर, ग्रामपंचायत सदस्य समीर बनकर, रूपाली बनकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सीताराम बनकर, अमोल बनकर, सुभाष ज्ञा. बनकर, सुभाष बनकर, उमेश बनकर, अर्जुन जाधव, स्वप्निल शिवरकर, भगवान बनकर, सचिन बनकर, राजेंद्र राऊत, विजय राऊत, शरद बनकर, दीपक बनकर, आलका बनकर, सुभाष द. बनकर उपस्थित होते. ग्रामस्थांनी रस्ता कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांनी आमदार विजय शिवतारे आणि रमेश इंगळे यांचे आभार मानले. विकासाची ही नवी सुरुवात गावाच्या प्रगतीत महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी भावना सरपंच अश्विनी बनकर यांनी व्यक्त केली.