प्रभात वृत्तसेवा सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली. थेट भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दुरंगी लढत झाली. आमदार विजय शिवतारे यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत सर्व जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार संजय जगताप यांनी सासवडमध्ये भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार केला होता. अखेर राजकीय संघर्षात भाजपने बाजी मारत सासवड नगरपरिषदेची सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे.भाजपकडून संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप यांनी नगराध्यक्षपदासाठी थेट मैदानात उतरून शिवसेनेचे उमेदवार सचिन भोंगळे यांचा १,०९१ मतांनी पराभव केला. आनंदीकाकी जगताप यांना ११, ३६२ मते मिळाली, तर शिवसेनेचे सचिन भोंगळे यांना १०,२७१ मते मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अभिजीत जगताप यांना ६८२ मते मिळाली.भाजपने १३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर शिवसेनेला ९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे नगरपरिषदेची सत्ता भाजपकडे कायम राहिली आहे. हा निकाल आमदार शिवतारे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे पुरंदर–हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असतानाही सासवड, जेजुरी, फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषदांवर शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करता न आल्याने त्यांना भविष्यात राजकीय धक्का मानला जात आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने जेजुरी तसेच फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषदांवर घड्याळ फडकवत यश मिळवले असले तरी सासवडमध्ये मात्र राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार उभे करण्यात यश मिळाले नाही. एकूणच पुरंदर तालुक्यातील राजकारणात निकालांनी मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या निकालांमुळे सासवड नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे आगामी काळात आणखी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. “सासवड शहराचा विकास करून कायापालट करू, हेच आमचे ध्येय आहे. ते आम्ही पूर्ण करू सासवडकरांनी आम्हाला अपेक्षित यश दिले आहे.” – आनंदीकाकी जगताप, नगराध्यक्ष, सासवड. “(स्व)चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवडचा विकास सुरू होता. त्याच पद्धतीने तो विकास व विकासाची दालने उघडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेऊन विकास केला जाईल. जेजुरी व फुरसुंगी उरुळी देवाची या ठिकाणी भाजपा विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे अडचणी वाढल्या.” – संजय जगताप, माजी आमदार. पुरंदर- हवेली.