प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये सत्ताधारी व्यवस्थेविषयी प्रचंड नाराजी दिसून आली. नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींमध्ये अतिक्रमण, अविकसित भूखंड, पायाभूत सुविधांतील तुटवडा, नगरपालिकेच्या कामकाजातील बेफिकिरी यांचा ठळक उल्लेख होता. असे महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अभिजित मधुकर जगताप यांनी सांगितले. समस्यांवर उपाययोजनेसाठी मविआची हमी आहे, अशी ग्वाही जगताप यांनी यावेळी दिली.विविध ठिकाणच्या अतिक्रमित दफनभूमीच्या जागा, आरक्षित भूखंडांचा चुकीचा वापर, अनेक वर्षे अविकसित पडून असलेली जमीन यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांकडून घेतली जाणारी भरमसाठ पावती, शहरभर पसरलेले खड्डेमय रस्ते, नदीला थेट जोडलेल्या सांडपाणी गटारांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता, दुर्गंधी हे दैनंदिन जीवनातील गंभीर प्रश्न असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच त्या ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे देण्यात येणारे ठेके, त्यांचा वाढलेला हस्तक्षेप आणि नगरपालिकेच्या कारभारात निर्माण झालेली एकाधिकारशाही याबद्दलही प्रचंड नाराजी व्यक्त झाली. अनेक प्रभागांमध्ये शेवटच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईटचा अभाव, विकासकामांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष किंवा चालढकल केल्याचे आरोप नागरिकांनी खुलेपणाने मांडले. निवडून आल्यानंतर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ न देणे हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे मोठे अपयश असल्याचे जगताप यांनीही अधोरेखित केले. शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात ठप्प असून जी कामे झाली ती निकृष्ट दर्जाची आहे. नागरी सुविधांची बिकट अवस्था ही सासवडकर जनतेसाठी गंभीर बाब असून सर्व समस्यांचा नेमका आढावा घेत आम्ही त्यावर ठोस उपाययोजना करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. लवकरच विकासनामा जाहीर करणार प्रचारसभेत बोलताना अभिजित मधुकर जगताप म्हणाले की, सासवड शहरासाठी लवकरच महाविकास आघाडीतर्फे विकासनामा जाहीर केला जाणार असून त्यातील बहुतेक महत्त्वाची कामे वर्षपूर्तीपूर्वी पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अनागोंदी व्यवस्थेविरोधात सक्षम पर्याय म्हणून आम्ही जनतेसमोर उभे आहोत. त्यामुळे सासवडकरांनी मशालीच्या चिन्हावर विश्वास ठेवून आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.