प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड आणि जेजुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी विविध बैठका, संवादसभा आणि प्रचार उपक्रम पार पडले. महिला, शिक्षक-प्राध्यापक, डॉक्टर तसेच केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी अशा विविध घटकांशी संवाद साधून भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सासवडमधील कार्यक्रमात भागातील संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना, स्वयं-सहाय्यता गट बळकटीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमुळे महिलांना मिळालेल्या सामाजिक-आर्थिक समर्थनावर भाष्य करीत उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले. महिलांनीही एकमुखाने समर्थन देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यावेळी सासवड येथील जैन मंदिरात व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी माजी मंत्री दादासाहेब जाधवराव, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप, नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार सारिका हिवरकर, मनोहर जगताप, लीना वढणे, दिनेश भिंताडे, शितल भोंडे, ज्ञानेश्वर जगताप, सोपान रणपिसे, स्मिता जगताप, मोनिका म्हेत्रे, मयूर चौखंडे, अर्चना जगताप, राजन जगताप, स्मिता जगताप, प्रवीण पवार, सुहास लांडगे, सुमाली राऊत, प्रदीप राऊत, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, दीप्ती सूर्यवंशी, अजित जगताप, पदाधिकारी उपस्थित होते. सासवड आणि जेजुरीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिक्षक व प्राध्यापकांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील गरजा, स्थानिक विकास, आणि सुशासनाच्या पुढील दिशा यावर विस्तृत चर्चा झाली. शिक्षकांनी मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करीत भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील डॉक्टर आणि केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधण्यात आला. कोविडनंतर आरोग्य क्षेत्राला मिळालेल्या बळाचा, पंतप्रधान मोदी यांच्या आरोग्यविषयक उपाययोजनांचा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीचा उल्लेख यावेळी करण्यात आला. पुरंदरमधील आरोग्य सुविधांच्या अडचणी निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही देण्यात आली.