प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती ( संभाजी गोरडे ) – शिरूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा आणि इतिहास परंपरेने जिल्हा परिषदेपासून ते आमदारकीपर्यंत नेतृत्व घडवून देणारा रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गट यंदा राजकीय गदारोळाचे प्रमुख केंद्र बनला आहे. गेल्या एक महिन्यात तीन प्रमुख आघाड्या : भाजप – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा गट – राष्ट्रवादी शरद पवार गट) यांच्या उमेदवार घोषणांनंतर ऐन थंडीत निवडणुकीचे तापमान वाढले आहे.या निवडणुकीचा परिणाम फक्त एक जिल्हा परिषद सदस्य निवडण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर थेट परिणाम करणार असल्याचे जानकारांचे मत आहे. निवडणुकीतील सर्वात नाट्यमय आणि चर्चेतील घटना म्हणजे आणि ज्योती मानसिंग पाचुंदकर (राष्ट्रवादी), स्वाती दत्तात्रेय पाचुंदकर (भाजप – शिवसेना) या दोन महिला उमेदवारांची थेट आमने- सामने लढत. यादोघी एकाच कुटुंबातील असल्याने निवडणुकीत कुटुंबाचे राजकीय विभाजन, घरगुती नेतृत्वाचा दबदबा, ग्रामस्थांमधील भावनिक नाते या सर्वांचे मिश्रण दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील थेट संघर्षात तिसरी बाजू म्हणून महाविकास आघाडीने नम्रता संदीप शिंदे (शिवसेना उबाठा) यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवर ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते, शरद पवार गटाचे पारंपरिक कार्यकर्ते, काँग्रेसचा शांत पण प्रभावी ग्रामीण मतदार या तिघांचे मोठे नेटवर्क उभे राहिले आहे. यामुळे तिरंगी लढत अधिक चुरशीची होणार आहे. कारेगाव पंचायत समिती गणात अनेक नावांची प्रचंड चर्चा आहे. यात भाजपच्या मनीषा पाचंगे, तुकाराम भोसले राष्ट्रवादीच्या निर्मला नवले, महाविकास आघाडीचे कुमार नाणेकर, सुधीर पुंडे ही नावे चर्चेत आहेत. पाचंगे व नवले हे जवळचे नातेवाईक असल्यामुळे पाचंगे – नवले या दोन महिला उमेदवारांमध्ये नातेवाईक वर्गाचे मत कोणाकडे झुकते, हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपचे मजबूत ‘बूथ मॉडेल’ आणि राष्ट्रवादीचा कुटुंब आधारित मतदार यांच्यातील संघर्षामुळे हा गट अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. रांजणगाव गणातील इच्छुक उमेदवार भाजप – सागर देवकर, राष्ट्रवादी – महेश फंड, संदीप सोनवणे, महाविकास आघाडीकडून विकास फंड, योगेश नरवडे, बापू गावडे हे इच्छुक आहेत. विजयी उमेदवार शिरूरचा आगामी आमदार? गेल्या दोन दशकातील आकडेवारी पाहिली तर रांजणगाव – कारेगाव गटातून निवडून आलेल्या नेतृत्वाने तालुका पातळीवरील मोठी पदे भुषवली, पक्षांतर्गत महत्वाची जबाबदारी मिळवली. विविध संस्थांच्या माध्यमातून मोठा प्रभाव निर्माण केला. त्यामुळे यावर्षी विजयी उमेदवारावर हा शिरूरचा आगामी आमदार होऊ शकेन का? ही सध्याची चर्चेही बाब ठरत आहे.