प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथे गुरूवारी (दि. ४) दुपारी साडेबारा वाजता झालेल्या दुर्दैवी घटनेत दोन एकर ऊस आगीत भस्मसात झाला. उसाच्या शेताजवळ असलेल्या विजेच्या खांबावर अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे गणेश बबन गावडे यांच्या उसाच्या शेताला क्षणात आग लागली. शेतात कामावर असलेल्या सुनील गावडे यांनी आग लागल्याचे पाहून तात्काळ गावकऱ्यांना जमा केले. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग क्षणाक्षणाला भडकत गेल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला. आग इतक्या वेगाने पसरली की, शेतकरी आणि ग्रामस्थांना पाहण्यापलीकडे काही करता आले नाही. दरम्यान, या ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किट होण्याच्या तक्रारी असल्याने, संबंधित विजेचा खांब तातडीने पाटाजवळ शिफ्ट करण्यात यावा, अशी मागणी भरत थोरात, सूर्यकांत बढे, नवनाथ थोरात आणि गणेश गावडे यांनी केली आहे. तसेच जळालेल्या ऊसाला तातडीने ऊसतोड मिळावी आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात आली आहे.