रांजणगाव गणपती (वार्ताहर) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचायत समिती गणासाठी पिंपरी दुमाला येथील अपक्ष उमेदवार संदीप सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनोख्या आणि आंदोलनात्मक पद्धतीने एन्ट्री घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गळ्यात खिळ्यांचा पट्टा व कांद्याची माळ घालून सोनवणे थेट शिरूर येथील अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोहोचले. पंचायत समिती गणातील मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांच्या प्रलंबित समस्या, परिसरात वाढलेली बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनात्मक प्रकार केल्याचे संदीप सोनवणे यांनी यावेळी सांगितले. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वेगळ्या पद्धतीने आवाज उठवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अनोख्या उमेदवारी अर्जामुळे रांजणगाव गणातील निवडणूक वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार संदीप सोनवणे यांच्या या आंदोलनात्मक प्रवेशामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.