प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषद निवडणूक मतमोजणी येत्या रविवारी (दि 21) रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रविवारी दि. 21 रोजी होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गर्कळ, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, नगर परिषदेच्या आस्थापना प्रमुख शिवानी चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील म्हणाल्या की, मतमोजणीदरम्यान कोणताही आक्षेप असल्यास तो मतमोजणीच्या ठिकाणीच नोंदवता येईल. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. या निवडणुकीत एकूण 17 हजार 770 मतदारांनी मतदान केले आहे. सर्व मतदान ईव्हीएमद्वारे झाले आहे. कंट्रोल युनिट बॅटरीवर चालते. वापरानंतर बटण बंद न केल्यास बॅटरी उतरू शकते. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत नवीन बॅटरी बसविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतमोजणीत मतमोजणी करताना उमेदवारांना समसमान मते पडल्यास चिट्ठी काढून विजयी उमेदवार घोषित केला जाईल.यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना सांगितले की, मतमोजणीदरम्यान कोणतीही चूक किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात राहील. आचार संहिता असल्याने कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई असेल. उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे. मतमोजणीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांनी उपलब्ध जागेतच वाहने उभी करावीत, असे आवाहन त्यांनी केले.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले की, मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराकडून उमेदवार, त्यांचा प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. मोबाईल जवळ बाळगता येणार नाही. मतमोजणी एकूण पाच फेर्यांमध्ये होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काही उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी प्रश्न विचारले. त्यांचे अधिकार्यांनी निरसन केले. पत्रकार परिषदेच्या शेवटी नगर परिषदआस्थापना प्रमुख शिवानी चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.