प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – सध्याच्या सामाजिक परिस्थितीत कमी वयातच विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीकडे झुकण्याची प्रवृत्ती वाढत असून ही बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. या प्रवृत्तीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी पालक, शिक्षक तसेच समाजातील सर्व जबाबदार घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार बाबाजी काळे यांनी केले. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वतीने तिन्हेवाडी (ता. खेड) येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बुधवारी (दि. 7) आमदार काळे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आमदार काळे पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात श्रमसंस्कार शिबिरासारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कष्टाची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मोलाची भूमिका बजावतात. श्रमातूनच संस्कार रुजतात आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे महत्त्व समजते, असेही त्यांनी नमूद केले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख बनतील, ग्रामीण जीवनाची जाण विकसित होईल तसेच समाजातील विविध समस्या समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक हिरामण सातकर, सतीश नाईकरे, तिन्हेवाडीच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच विठ्ठल वरकड, रंगनाथ आरूडे, बाळासाहेब आरूडे, हुतात्मा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश अहेरकर यांनी केले, तर प्रा. साईनाथ पाचारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व नैतिक मूल्यांची जोपासना होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.