प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सुसंस्कार आत्मसात करावेत आणि भविष्यात देशाचे आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. काळमोडी (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुणे दूध संघाचे संचालक अरुणशेठ चांभारे, सरपंच सुनीता गोपाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम विभाग महिला अध्यक्ष सुजाता पचपिंड, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण मुके आणि नामदेव गोपाळे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर भागवत, उपप्राचार्य सिलदार पावरा, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिता मुळूक, कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहन देवगडे व अर्चना कानवडे यांसह काळमोडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या खजिनदार सुरेखा मोहिते व सचिव डॉ. शिवाजीराव मोहिते यांनीही शिबिरासाठी शुभेच्छा संदेश धाडला. प्राचार्य डॉ. किशोर भागवत यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रानवडे यांनी केले, तर आभार प्रा. मोहन देवगडे यांनी मानले. या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थी ग्रामस्वच्छता, जलसंधारण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणार आहेत. “महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजसेवा करावी. सरकारी योजनांचा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत प्रचार, प्रसार आणि जनजागृती करावी. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करावेत.” – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड.