प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने आज (दि. 2) खेड उपविभागीय कार्यालयासमोर शांततामय आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे 30 ते 40 नागरिकांनी सहभाग घेतला.निवडणूक प्रक्रियेत पैशाचा वापर, साड्यांचे वाटप, गुप्त बैठका, दबाव तंत्र व ‘सेटिंग’ यांसारख्या गैरप्रथांना आळा घालावा, तसेच संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष निरीक्षण पथक तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना स्वप्निल गायकवाड म्हणाले, लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी स्वच्छ, मुक्त व पारदर्शक निवडणूक होणे अत्यावश्यक आहे. निवडणुकीत पैशाचा वापर, साड्यांचे वाटप, दबाव तंत्र व गैरप्रकार करणार्या व्यक्ती अथवा गटांवर लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत कारवाई करून त्यांना अपात्र ठरवण्यात यावे.या आंदोलनात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यशवंत जाधव, बबन काळे, वसंत काळे, राहुल मोरे, अशोक वायकर यांच्यासह खेड तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तुषार गायकवाड उपस्थित होते. आंदोलन शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. निवडणूक प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रामाणिक, निष्पक्ष व पारदर्शक राहावी यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.