प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – कृषी विभागाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा, तसेच शेतकर्यांनीही या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लाभार्थी शेतकर्यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती बाळ ठाकूर, मंडल कृषी अधिकारी श्रीमती अश्विनी नंदकर, वृषाली पाटील, उपकृषी अधिकारी विठ्ठल राऊत, प्रवीण शिंदे, शरद इंदोरे, सहायक कृषी अधिकारी किरण कानडे तसेच लाभार्थ्यांचे नातेवाईक उपस्थित होते. आमदार बाबाजी काळे म्हणाले, खेड तालुक्यातील 28 शेतकर्यांचे प्रस्ताव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शासनाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 प्रस्तावांना मंजुरी मिळून मयत व जखमी शेतकर्यांच्या वारसांना एकूण 17 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यापूर्वीही तीन शेतकर्यांच्या वारसांना धनादेश देण्यात आले आहेत.ते पुढे म्हणाले, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जात असून तालुक्यात आतापर्यंत सुमारे 300 शेतकर्यांना ट्रॅक्टरचा लाभ देण्यात आला आहे. भविष्यातही कृषी विभागाकडून अधिकाधिक शेतकरीहिताच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी स्मिता भसे (सांगुर्डी), दशरथ गायकवाड (दोंदे), ज्योती खेंगले (पाईट), सुनीता जाधव (सुरकुंडी), तुकाराम गोपाळे (आडगाव), अक्षदा कड (संतोषनगर), भीमाबाई भोकटे (खरपुड), शैलेश वाळुंज (साबळेवाडी), तुकर्ण ठोकळ (नायफड) या लाभार्थी शेतकर्यांच्या वारसांना कृषी विभागाच्या वतीने धनादेश वितरित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी प्रवीण शिंदे यांनी केले.