Pune ZP Election – भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी मांडवगण फराटा आणि वडगाव रासाई परिसरातील मतदारांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्र व राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण, पीएम किसान आणि वीजबिल माफी यांसारख्या योजनांमुळे जनतेला कसा फायदा झाला हे सविस्तर समजावून सांगितले.या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारे सचिन बंडू शेलार यांनी सरपंच म्हणून केलेल्या विकासकामांचा,आरोग्य सुविधेसाठी आणलेल्या रुग्णवाहिकेचा आणि कोरोना काळातील कार्याचा कंद यांनी गौरव केला. तसेच मांडवगण फराटा पंचायत समिती गणातील उमेदवार शोभा नाना वराळे (जगताप) यांच्या संयमी व सुसंस्कृत प्रतिमेमुळे महिला बचत गटांना आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वडगाव रासाई पंचायत समितीचे उमेदवार माऊली पाटोळे यांच्या उच्चशिक्षित आणि वारकरी विचारांच्या पार्श्वभूमीमुळे तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रदीप कंद यांनी यावेळी स्पष्ट केले की, आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या भागात ५० कोटींची कामे केली असून निर्वी येथे ३ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे.यावेळी आबासाहेब सोनवणे, एकनाथ शेलार, नवनाथ शितोळे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. “घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आपण संचालक मंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यास तयार आहोत.” – प्रदीप कंद, भाजप, पुणे जिल्हाध्यक्ष