Pune ZP Election – तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराने रणधुमाळी उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी जाहीर प्रचारसभा रद्द केल्याने मोठ्या सभा थांबल्या असल्या, तरी गावोगावी घराघरांत जाऊन गाठीभेटी, थेट संवाद, वैयक्तिक संपर्कावर प्रचाराचा जोर वाढला आहे. तळेगाव गटात यंदा चौरंगी लढत रंगली असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वातावरण चांगलेच तापले आहे. शेवटच्या टप्प्यात सर्व उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर बैठका मारल्याने ही लढत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली आहे.तळेगाव गटात भाजपाकडून दीपाली राहुल गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेखा बांदल, शिवसेनेकडून सारिका राहुल कर्पे तर अपक्ष म्हणून रेश्मा जयेश शिंदे रिंगणात उतरल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराची स्वतःची ताकद, जनसंपर्क आणि राजकीय गणिते असल्याने मतदारही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस गटात प्रचाराचा शेवटचा टप्पा निर्णायक ठरत आहे. चौरंगी लढतीत काम, जनसंपर्क, पक्षबळ, सहानुभूती या सगळ्यांचा निकालावर नेमका काय परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र या गटातील राजकीय लढत शेवटच्या श्वासापर्यंत रंगतदार राहणार आहे. दीपाली गव्हाणे अभ्यासू, पक्षबळ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार दीपाली राहुल गव्हाणे या उच्चशिक्षित, अभ्यासू, संयमी नेतृत्त्व म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या पाठीशी भाजपाची भक्कम संघटनात्मक ताकद उभी असून बूथ पातळीवरून प्रचार यंत्रणा काम करताना दिसत आहे. दीपाली गव्हाणे यांचा ग्रामप्रशासनातील अनुभव आणि पती राहुल गव्हाणे यांचे अनेक वर्षांचे सामाजिक कार्य याचा थेट फायदा प्रचारात होत आहे. जिल्हा परिषद निवडणूक विशेष म्हणजे डिंग्रजवाडी गाव संपूर्ण ताकदीने गव्हाणेंच्या प्रचारात उतरली आहे. भाजपाची बाजू अधिक भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.ग्रामीण मतदारांमध्ये गव्हाणे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे. संघटन, जनसंपर्कावर सारिका कर्पे मैदानात शिवसेनेच्या उमेदवार सारिका राहुल कर्पे यांनी गेल्या पाच वर्षांत तळेगाव गटात सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून जनतेशी नाळ जोडली आहे. पती राहुल कर्पे यांचा संपूर्ण गटातील मजबूत जनसंपर्क, शिवसेनेची कार्यकर्त्यांची फळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद यामुळे कर्पे यांची बांधणी मजबूत मानली जात आहे. यातच टाकळी भीमा गावचा एकमुखी पाठिंबा कर्पेंच्या पाठीशी उभा असल्याने शिवसेनेच्या प्रचारात आत्मविश्वास दिसून येतो. ‘लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर काम करणारा पक्ष’ अशी भावना ग्रामीण भागात कर्पेंना पोषक ठरत आहे. बांदल दाम्पत्याची प्रतिष्ठा पणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेखा बांदल या गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत. पती माजी सभापती मंगलदास बांदल आणि रेखा बांदल यांना या गटातून दोन टर्म काम करण्याची संधी मिळाली आहे. मागील निवडणुकीत अपक्ष लढत देत इतर पक्षांना शह देत दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. त्यामुळे बांदल दाम्पत्याचा वैयक्तिक जनसंपर्क आजही मजबूत असल्याची चर्चा आहे. यंदा मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी, दोन राष्ट्रवादी गट एकत्र येणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीची भावना या सगळ्याचा बांदलांना नेमका किती फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेश्मा शिंदे यांच्यासोबत महिलांची ताकद अपक्ष उमेदवार रेश्मा जयेश शिंदे या प्रचारात वेगळ्याच शैलीने पुढे आल्या आहेत. महिला संघटन कौशल्य, थेट संवाद, कामाचा आधार यावर त्यांचा प्रचार सुरू आहे. पती जयेश शिंदे यांनी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व तालुकाध्यक्ष असताना तळेगाव ढमढेरे- रांजणगाव सांडस गटात अनेक विकासकामे, रस्ते, योजना मंजूर करून आणून शासनदरबारी काम करणारा कार्यकर्ता, अशी ओळख निर्माण केली. याच कामाच्या विश्वासावर रेश्मा शिंदे या मैदानात उतरल्या असून विठ्ठलवाडीकरांचा ठाम पाठिंबा त्यांना मोठी ताकद देत आहे. “पक्ष नाही, पण काम आहे” ही भूमिका मतदारांना भावताना दिसत आहे.