Pune ZP Election – शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यंदा कमालीच्या चुरशीच्या ठरत आहेत. या रणसंग्रामात तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने या लढतींना प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रस्थापित शिरूर राजकीय घराणी आपले वर्चस्व कायम राखणार की नव्या समीकरणांतून नवे नेतृत्व पुढे येणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.शिरूर तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद जागा असून मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता, तर एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता. यंदा मात्र, भाजपने आक्रमक प्रचार करीत राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अनेक दिग्गजांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. इतर गटांमध्येही निवडणूक तितकीच रंगतदार ठरली आहे. तळेगाव- रांजणगाव सांडस, शिक्रापूर- सणसवाडी, पाबळ- केंदूर आणि रांजणगाव गणपती गटांमध्ये थेट किंवा चौरंगी लढती होत असून प्रत्येक गटात प्रतिष्ठेचे राजकारण दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेणार की भाजप संघटनबळाच्या जोरावर अधिकाधिक जागा जिंकणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, एकूणच नेत्यांच्या घरातील उमेदवारांमुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक शिरूर तालुक्यात चुरशीची व निर्णायक ठरणार, हे मात्र निश्चित आहे. गेल्या दहा वर्षांत शिरूर तालुक्यातील राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप हेच दोन पारंपरिक पक्ष आमने- सामने होते. मात्र, बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपला खमके नेतृत्व मिळाले नाही. माजी आमदार अशोक पवार यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणूक त्या माध्यमातून अशोक पवार यांनी आपले अस्तित्व राखून ठेवले आहे. मात्र, २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशोक पवार यांना मानणारा जनाधार आजही टिकून आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अशोक पवार यांना फटका बसला आहे. गेल्या वर्षांपासून राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने राष्ट्रवादीची एकसंघ ताकद वाढली आहे. त्याचा पुरेपूर लाभ हे अशोक पवार यांना होईल काय, याची उत्सुकता लागली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली आहे. त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांचा या लढतीत कस लागला आहे. टाकळी हाजी गटात गावडे कुटुंबीयाची आरपारची लढाई होत आहे. या निवडणुकीनंतर भविष्यात टाकळी हाजी गटाचे नेतृत्व कोण करणार, यासाठी झेडपीची लढत लिटमस टेस्ट ठरली आहे. मालतीताई पाचर्णे यांना सहानुभूती मिळणार? झेडपीच्या आखाड्यात माजी आमदार (स्व) बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे या भाजपच्या वतीने शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या वृषाली बबन वाळके यांचे आव्हान आहे. बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीत सहानुभूतीचा लाभ मालती पाचर्णे यांना होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लढतीमुळे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजेंद्र गावडे गड राखणार काय माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक ऐनवेळी उमेदवारी कापल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली सहा दशके गावडे यांचा हा गड मानला जातो. मात्र, यंदा येथे चौरंगी लढत होत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामूअण्णा घोडे, शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब डांगे, शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पोकळे अशी तगडी लढत रंगली आहे. त्यामुळे हा गट तालुक्यातील सर्वात लक्षवेधी ठरला आहे. सुजाता पवार कमबॅक करणार माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या निवडणुकीत सुजाता पवार यांच्या माध्यमातून राजकीय कमबॅक करण्यासाठी अशोक पवार यांनी जोरदार रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे सचिन शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे दादासाहेब फराटे अशी एकूण चौरंगी लढत होत आहे.