Pune ZP Election 2026 – इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने आता विकासाचा मुखवटा बाजूला सारत खर्या राजकीय संघर्षाचे दर्शन घडवायला सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांविरुद्ध विषारी राजकारण करणारे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अचानक एकाच ‘घड्याळा’खाली उभे राहिल्याने तालुक्यात संभ्रम नव्हे, तर संतापाची लाट उसळली आहे. विकासासाठी एकत्र आलो, असा खुलासा केला जात असला, तरी वास्तवात ही युती सत्तेसाठीची तडजोड असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायत समितीचे सोळा गण – या सगळ्या ठिकाणी उमेदवारी वाटप करताना पक्षासाठी आयुष्य झोकून देणारे, संघर्षातून उभे राहिलेले कार्यकर्ते थेट बाजूला फेकले गेल्याची तीव्र भावना गावोगावी पसरली आहे. घराणेशाहीसाठी चिन्ह, तर कार्यकर्त्यांसाठी फक्त मिरवणूक, अशी संतप्त प्रतिक्रिया आता दबक्या आवाजात नव्हे, तर चहाच्या टपर्यांवर, चौकात आणि बैठकीत उघडपणे ऐकू येत आहे.खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदापूरने जे धक्कादायक चित्र पाहिले होते, तेच चित्र पुन्हा आकार घेत असल्याचे राजकीय निरीक्षक स्पष्टपणे सांगत आहेत. नेते व्यासपीठावर एकत्र; पण मतदार मात्र मानसिकदृष्ट्या दूर-ही दरी आता भरून न निघणारी होत चालली आहे. हर्षवर्धन पाटील-दत्तात्रय भरणे विरोधी भाजपचे उमेदवार तुलनेने कमकुवत असल्याचा दावा केला जात असला, तरी सत्ताधारी गटातील अंतर्गत नाराजीमुळे गावोगावी बड्या नेत्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र मतदारांपासून लपून राहिलेले नाही.रविवारी एका मॅरेथॉनमध्ये कृषिमंत्री भरणे आणि माजी मंत्री पाटील यांनी एकत्र झुम्बा डान्स करत ‘आम्ही एक आहोत’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा देखावा पाहून मतदारांमध्ये उत्साह नव्हे, तर प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे आज अचानक मित्र कसे झाले? चूक नेमकी कुणाची होती? आमच्यावर इतकी वर्षे लादलेली भांडणे खोटी होती का? – असे प्रश्न गावोगावी चर्चेचा विषय ठरत आहेत.या निवडणुकीत विरोधकांनी एखाद्याही जागेवर खाते उघडले, तरी त्याची जबाबदारी नेमकी कुणाची? हा सवाल आता थेट दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वावर उपस्थित केला जात आहे. निकालानंतर केवळ पराभव-विजयच नाही, तर आतापर्यंत दडवून ठेवलेली नाराजी, अंतर्गत संघर्ष आणि कार्यकर्त्यांचा रोष उघडपणे समोर येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. पुढचा आमदार कोण? याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय गणितेही बदलू लागली आहेत. या मतदारसंघातून पुढचा आमदार कोण? कुणाला विधान परिषदेचे तिकीट? आणि कुणाला बाजूला केले जाणार? या चर्चांनी तालुक्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत इंदापूरच्या रणांगणात आपली संपूर्ण ताकद उतरवली असून भाजपचे नेते प्रवीण माने, प्रदीप गारटकर तसेच सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने हे प्रत्येक गटात गावोगावी पोहोचत आहेत. जनमताचे काय? बाहेरून पाहता इंदापूरमध्ये सत्ताधार्यांची पकड मजबूत असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी आतमध्ये साचलेला रोष, दडलेली नाराजी आणि कार्यकर्त्यांची घुसमट निकालाच्या दिवशी मतपेटीतून व्यक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा न राहता, राज्याच्या राजकारणाला हादरा देणारा ‘जनमताचा स्फोट’ ठरेल, अशीच चर्चा सध्या इंदापूरच्या प्रत्येक चौकात रंगली आहे.