Pune ZP Election 2026 : तालुक्याच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ होत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. यावरून भाजपने घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडत इंदापूरची लढाई लोकशाही विरुद्ध घराणेशाहीची असल्याचा सूर लावला आहे. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच लढत आहेत, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. तालुक्याच्या विकासात दोघांचाही सिंहाचा वाटा आहे. जि. प. व पं. स. सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर एकत्रित लढवणार असून, ग्रामीण भागात घड्याळाचे नाते आजही घट्ट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वालचंदनगर-बोरी गणातून पंचायत समितीसाठी सुपुत्र श्रीराज भरणे निवडणूक लढवीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका असल्याने त्यांचा विजय असल्याचे, भरणे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राजकारणात वैर नसते, विचारांची लढाई असते, अशी भूमिका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडली. पक्षप्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयानुसार ग्रामीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मागील निवडणुका वेगवेगळ्या लढलो असलो तरी जनहितासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे पाटील म्हणाले. कन्या अंकिता पाटील-ठाकरे, श्रीराज भरणे यांच्यासह सर्व उमेदवारांचा प्रचार ताकदीने करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. हर्षवर्धन पाटील-दत्तात्रय भरणे तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकांमुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून नाराजी दूर केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांचे कट्टर समर्थक व पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांनी भाजपकडून उमेदवारी घेतल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, हा अनपेक्षित धक्का असून स्थानिक कारणांमुळे त्यांनी भूमिका घेतली असावी. तरीही त्यांची समजूत काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कृष्णा भीमा विकास आघाडी आता अस्तित्वात नाही, असा दावा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी केला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. टोकाचे विरोधक एकत्र आल्याने जनतेत नाराजी असून लोक भाजपला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने कधीही घराणेशाहीला थारा दिलेला नाही. मात्र राष्ट्रवादीत आठपैकी तीन जागा थेट घराणेशाहीकडे झुकल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजप नेते प्रवीण माने यांनीही घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. इंदापूरकर स्वाभिमानी आहेत. घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांचे हक्क हिरावले गेले आहेत. उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांचा राग आणि असंतोष आता एकजुटीतून व्यक्त होईल, असे ते म्हणाले. भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा दावा त्यांनी केला.राष्ट्रवादीची एकजूट, भाजपचा आक्रमक हल्लाबोल आणि घराणेशाहीचा केंद्रस्थानी आलेला मुद्दा यामुळे इंदापूरची ही निवडणूक केवळ स्थानिक राहिलेली नसून, राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी जनमतचाचणी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.