प्रभात वृत्तसेवा यवत – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर भांडगाव (ता.दौंड) येथे वतीने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली असून ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे. यावेळी महामार्गाच्या बाजूला असणारे स्थानिकांचे अतिक्रमण काढण्यासाठी कडेकोट आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पूर्वीच जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. मात्र, महामार्गालगत असलेल्या काही व्यक्तींनी परवानगी न दिल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते.या प्रकरणात न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश दिलेला नसल्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीने अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई सुरू केली. पुणे बाजूने सोलापूरकडे जात असताना भांडगाव येथे सोनाक्षी मंगल कार्यालय येथील ओढ्यापासून जय मल्हार हॉटेलपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हे अंतर जवळजवळ एक किलोमीटर आहे. या उड्डाणपुलासाठी महामार्गाच्या मध्यापासून डावीकडे सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला २४ मीटर आणि उजवीकडे पुण्याच्या बाजूला ३६ मीटर एकूण ६० मीटर रुंदीच्या क्षेत्राचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या अधिग्रहित क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन हटवण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महसूलचे अधिकारी,तैनात करण्यात आले होते.