Pune Crime – पुण्याजवळ शेतात काम असून रोज एक हजार रुपये मजुरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना सोलापूर जिल्ह्यात नेऊन जबरदस्तीने ऊसतोडणीचे काम करून घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण करून धमकावले जात होते. या ठिकाणाहून कसाबसा पळून आलेल्या वाघोलीतील 33 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, म्हाडा (जि. सोलापूर) येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 ते 29 डिसेंबर दरम्यान घडला.वाघेश्वर मंदिराजवळ राहणारा हा तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. 23 डिसेंबर रोजी उशिरा डिलिव्हरी दिल्यानंतर दारूच्या नशेत तो पुणे रेल्वे स्टेशन परिसरात झोपला. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. दिवसभर स्टेशन परिसरात फिरल्यानंतर रात्री एका अनोळखी व्यक्तीने त्याला काम करशील का, असे विचारले. कामाची गरज असल्याने तरुणाने होकार दिला. पुण्याजवळ शेतात काम असून रोज एक हजार रुपये मजुरी मिळेल, असे सांगण्यात आले.24 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता पुणे स्टेशनवरून आणखी दोन-तीन जणांसह त्याला एका कारमध्ये बसवण्यात आले. पहाटे तीनच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी उतरवून त्यानंतर मालवाहू वाहनातून नाडी, म्हाडा येथील आरोपींच्या खोलीत नेण्यात आले. तेथे त्यांच्याकडून पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ऊसतोडणीचे अत्यंत कष्टाचे काम करून घेतले जात होते. ऊसतोडणीचे काम जमत नसल्याने किंवा थकव्यामुळे कामास नकार दिल्यास केबलच्या वायरने व बांबूने मारहाण करून जबरदस्तीने काम करायला लावले जात होते. काम संपल्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवले जात होते. या संपूर्ण काळात कामाचा मोबदला म्हणून एक रुपयाही देण्यात आला नाही.29 डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास संधी साधून हा तरुण शेतातून पळून मुख्य रस्त्यावर आला. तेथून तो कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचला. एका व्यक्तीच्या मोबाईलवरून त्याने वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर रेल्वेने पुणे स्टेशनला येत ससून रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर त्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत असून, जबरदस्तीने मजुरी करून घेणे, मारहाण व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.