प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषदेच्या विकासकामांचा बट्ट्याबोळ सध्याच्या सत्ताधार्यांनी करून ठेवला असून, नागरिकांचे मूलभूत प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत मधुकर जगताप यांनी त्यांच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी केली.सासवड येथील शिवतीर्थ चौकात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने सासवड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जगताप बोलत होते. या प्रचार सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. अभिजीत जगताप म्हणाले, सासवड नगरपरिषदेकडे विकासकामांसाठी निधी असूनही, अक्षम्य आणि निष्क्रिय सत्ताधार्यांमुळे अनेक प्रलंबित कामे अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. शहरातील जवळपास प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय असून, अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत, नागरिकांची हालहवाल विचारात न घेता शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. जगताप यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरही टीका केली. स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून सुद्धा शहरभर उघड्यावर कचरा पडून असणे ही लाजिरवाणी आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणारी बाब चिंताजनक आहे.कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे दुर्गंधीसोबत नागरिकांना डेंग्यू सदृश साथीच्या आजारांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. तसेच, शहरात वाढविण्यात आलेल्या करांमुळे नागरिकांचे आर्थिक ओझे वाढले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सत्ता आल्यावर नागरिकांवरील अनावश्यक कारभार कमी करू. शहरातील सेवांची गुणवत्ता आणि सेवाहमी सुधारल्याशिवाय करवाढ योग्य नाही, असे जगताप यांनी स्पष्ट केले. सासवड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल यासाठी वीर जलाशयातून पाणी आणण्याचे काम प्राधान्याने हाती घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील काँग्रेस पक्षाचे प्रभारी सुनील असवलीकर, बबूसाहेब माहूरकर, विधानसभा समन्वयक राहुल गिरमे, बंडूकाका जगताप, माजी सभापती रमेश जाधव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शहरप्रमुख राजेंद्र जगताप, निरा बाजार समितीचे संचालक गणेश होले यांसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.