प्रभात वृत्तसेवा न्हावरे – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर ग्रामीण- न्हावरे जिल्हा परिषद गटात राजकीय रणधुमाळी सुरु झाली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तृप्ती अजय सरोदे वगळता कोणत्याच राजकीय पक्षाचा इच्छुक उमेदवार अजुनही निवडणुकीची तयारी करताना दिसत नाही. मात्र, तृप्ती सरोदे यांनी तीन महिन्यांत शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर मतदारांची भेट घेतली आहे. काही अपवाद वगळता या गटात सन्नाटा पसरला आहे. येत्या तीन दिवसांत राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे.२०१७ मध्ये शिरुर ग्रामीण- न्हावरे जिल्हा परिषद गटात भाजपाकडून राहुल पाचर्णे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जगदाळे पाटील यांची थेट समोरासमोर लढत झाली. त्यावेळी राजेंद्र जगदाळे यांचा २८०५ मतांनी विजय झाला होता. सध्या या गटात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण आहे. राष्ट्रवादीकडून तृप्ती सरोदे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्या पत्नी कविता जगदाळे तसेच भाजपाकडुन माजी आमदार लोकनेते (स्व) बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अजुनही कोणी इच्छुक पुढे आलेले नाही. भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने या गटावर वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली असून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या गटात आपली पारंपरिक पकड कायम ठेवण्यासाठी सरसावली असून अनुभवी नेते व माजी पदाधिकाऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखवण्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने ‘विकास’ आणि केंद्र- राज्य सरकारच्या योजनांचा मुद्दा पुढे करीत गटात जोरदार संघटनबांधणी सुरु केली आहे. तृप्ती सरोदे यांची प्रचारात आघाडी तृप्ती सरोदे यांनी गटातील गावोगावी बैठका, गुप्त राजकीय चर्चा, कार्यकर्त्यांची फळी उभारणी आणि सोशल मीडियावरुन प्रचार सुरु केला असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार आहे. लवकरच निवडणुकीची धग वाढणार असून इच्छुकांचे चेहरे राजकीय पटलावर उमटणार आहेत. शिरुर ग्रामीण – न्हावरे जिल्हा परिषद गटातील ही लढत कोणाच्या पारड्यात पडणार, महायुती की महाविकास आघाडी, की एखादा ताकदवान अपक्ष धक्का देणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रचारातील लक्षवेधी मुद्दे शिरूर- ग्रामीण- न्हावरा जिल्हा परिषद गटात समस्या आहेत. त्यात त्याचे निराकारण करण्यासाठी इच्छुक उमेदवार आश्वासनांची खैरात करणार आहेत. निवडणुकीत चासकमानच्या टेल टू हेड पाण्याचा विषय, रस्त्यांची दुरवस्था, शेतीसाठी वीज, एमआयडीसीतील रोजगार आणि आरोग्य सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. उमेदवारांची निवड करताना मतदार याच मुद्द्यांवर निर्णय घेणार असल्याचे चित्र आहे.