प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. यात आता राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे मंचरचे निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. शुक्रवार, दि. 28 रोजी या दोन्ही नेत्यांच्या सभा मंचर शहरात होणार असून त्यांच्या भाषणांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – भाजप युतीतर्फे मोनिका सुनील बाणखेले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पॅनलतर्फे राजश्री दत्तात्रय गांजाळे मैदानात उतरल्या आहेत. राज्यात महायुतीचेच सरकार असले तरी मंचरमध्ये मात्र भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती विरुद्ध शिवसेना (शिंदे) असा थेट सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात वेगळे समीकरण तयार झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. सभास्थळांची निवड, जनसंपर्क मोहीम, सोशल मीडियावरील प्रचार, बॅनर्स–पोस्टर्स यामुळे संपूर्ण शहरात निवडणूकदारांची उत्सुकता वाढली आहे.अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंचरमध्ये काय बोलणार? परस्परांवर टीका-टिप्पणी होणार की स्थैर्य आणि विकासाचे संदेश दिले जाणार, याबाबत लोकांत कुतूहल निर्माण झाले आहे. सभांना मोठी गर्दी कशी करता येईल, यासाठी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गडबडीत आहेत.वाड्या-वस्त्यावरील बैठकांचे नियोजन, वाहनव्यवस्था, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती, युवकांचा उत्साह, या सर्व गोष्टींनी निवडणुकीची रंगत वाढवली आहे. पहिल्याच निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांच्या सभा मंचर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीतच राज्यातील दोन वरिष्ठ नेत्यांच्या सभा होत असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या राजकीय शक्तीप्रदर्शनाकडे लागले आहे.आगामी मतदानावर या सभांचा नेमका परिणाम कितपत होणार, हे मात्र येणारा काळ ठरवणार आहे.