प्रभात वृत्तसेवा पुणे – दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस ठेऊन मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीचे गायब झाले आहेत. रणदिवे हे गायब झाल्यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, दोन दिवस उलटून गेले तरी देखील यवत पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना रणदिवे यांचा शोध लागला नसल्याने पोलिसांच्या खाकीबद्दल आणि कर्तव्यावर तालुक्यातील त्रस्त जनता आणि आंबेडकरी चळवळीमधील सामाजिक संघटना प्रश्न उपस्थित करीत आहेत. याबाबत रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. मात्र त्यांची भेट होऊ शकली नसल्याने त्यांनी अधीक्षक यांच्या नावे विनंती अर्जाद्वारे (दि.५) दुपारी ३ वाजलेपासून बेपत्ता असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी एक वर्षापासून वारंवार मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केलेले असून ते बेपत्ता झालेले आहेत. ४० तासांहून अधिक होऊन देखील ते मिळून येत नसून उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे पोलीस निरीक्षक देशमुख यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे माझे पती यांचे तक्रार अर्जाची चौकशी व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून न होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असल्याने विविध आंबेडकरी चळवळींच्या कार्यकर्यांनी उडी घेतली असून रणदिवे यांना लवकर शोधून काढावे अन्यथा संबंध आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते यांचा अंत पाहू नये, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून नारायण देशमुख व बापूराव दडस यांची तात्काळ बदली व निलंबन करावे, अशी मागणी आंबेडकर जनतेतून आणि सामाजिक संघटनांमधून होत आहे.