प्रभात वृत्तसेवा चिंबळी – राजगुरुनगर ते नाशिक फाटा तसेच चाकण ते पुणे स्टेशन या मार्गावर थेट पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी चाकण व परिसरातून होत आहे. या मागणीला नागरिक, विद्यार्थी तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे.नाशिक फाटा ते पुणे शहरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर झाला आहे. मात्र या मेट्रो सेवेचा लाभ घेण्यासाठी राजगुरुनगर, चाकण व परिसरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या राजगुरुनगर, चाकण, कुरुळी, निघोजे, मोई व चिंबळी एमआयडीसी परिसरातील हजारो कर्मचारी व विद्यार्थी दररोज काम व शिक्षणासाठी पुणे शहरात ये-जा करतात. मात्र थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रथम भोसरीपर्यंत जावे लागते. त्यानंतर पुन्हा नाशिक फाटा किंवा पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी वेगळी बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात असून मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. नाशिक फाटा ते पुणे शहरामध्ये मेट्रो सेवा उपलब्ध असल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. राजगुरुनगर ते नाशिक फाटा आणि चाकण ते पुणे स्टेशन थेट बस सेवा सुरू झाली, तर या परिसरातील प्रवाशांना मेट्रोद्वारे पुढील प्रवास अत्यंत सुलभ व जलद करता येईल. यामुळे वेळेची बचत होईल, तसेच वाहतूक कोंडी, खासगी वाहनांचा वापर व प्रदूषण यामध्येही घट होण्यास मदत होईल. विशेषतः चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहत, कुरुळी, चिंबळी, निघोजे व मोई परिसरातील मोठा कामगार वर्ग दररोज प्रवास करत असतो. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व नोकरीसाठी पुणे शहरात जाणार्या तरुणांसाठी ही बस सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे संबंधित परिवहन प्रशासनाने प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन राजगुरुनगर ते नाशिक फाटा व चाकण ते पुणे स्टेशन या मार्गावर तातडीने थेट पीएमपीएल बस सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ही सेवा सुरू झाल्यास संपूर्ण खेड तालुक्याला पुणे मेट्रोशी थेट जोड मिळून सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.