प्रभात वृत्तसेवा वाघोली – विमाननगर येथे व्यापारी संघटनेची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत व्यापार्यांच्या विविध समस्या, सूचना तसेच परिसरातील व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व व्यापारी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग या वेळी लक्षवेधी ठरला. विमाननगर व लोहगाव परिसरातील व्यापार्यांच्या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने केली जाईल, असे आश्वासन प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार रामभाऊ दाभाडे यांनी उपस्थित व्यापार्यांना दिले.पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील विविध भागांत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. याच अनुषंगाने वृंदावन पार्क परिसरात नागरिकांशी भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांनी प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. वृंदावन पार्क परिसरातील नागरी सुविधा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा तसेच परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि रामदास दत्तात्रय दाभाडे यांना येणार्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी नागरिकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 मधील काळभोर वस्ती परिसरात माता-भगिनींसोबत संवाद साधण्यात आला. घराघरांतून मिळालेला जिव्हाळा, आपुलकी आणि मनमोकळा संवाद या भेटीला वेगळीच ऊर्जा देणारा ठरला. महिलांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न मोकळेपणाने मांडले. त्यांच्या अनुभवांमधून परिसराच्या विकासासाठी आवश्यक बाबी अधिक ठळकपणे समोर आल्या. तसेच संत नगर परिसरात प्रचार दौर्यानिमित्त भेट देण्यात आली. नागरिकांशी थेट संवाद साधत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता व इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी दिलेल्या सूचनांमधून परिसर विकासाची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. “माता-भगिनींनी व्यक्त केलेला विश्वास आणि दिलेली साथ आमच्या सर्व उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे. विमाननगर, लोहगाव, सोमनाथ नगर व वाघोली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक संवेदनशीलतेने, जबाबदारीने आणि ठोस कृतीतून काम करण्याचा आमचा निर्धार या भेटीनंतर अधिक मजबूत झाला आहे.” – रामभाऊ दाभाडे, उमेदवार प्रभाग क्रमांक 3