प्रभात वृत्तसेवा पाटस – वरवंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिक्षिकेच्या सातत्याने सुरू असलेल्या निष्काळजीपणामुळे अखेर पालकांचा संताप उसळला आहे. अनेक महिन्यांपासून शाळेत नियमित अध्यापन न करणे, ऑनलाईन कामाचे कारण सांगत तास चुकवणे, शिकवण्याऐवजी मोबाईलवरच वेळ घालवणे तसेच विद्यार्थ्यांना अनावश्यक टार्गेट करून मानसिक त्रास देणे, अशा प्रकारांच्या तक्रारी पालकांनी वारंवार केल्या होत्या. मात्र, यावर कोणताही तोडगा न निघाल्याने पालकांनी एकमताने विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.वरवंड येथील कौठीचा मळा येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत सध्या एका शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शिक्षिका शाळेत आल्यानंतर शिकविण्याऐवजी मोबाईलवरच वेळ घालवणे तसेच विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण करून मानसिक त्रास देणे, अनेक महिन्यांपासून शाळेत नियमित अध्यापन न करणे असे प्रकार करत असून याबाबत त्या शिक्षिकेकडे पालकांनी विचारणा केली असता, “माझी फार तर बदली होईल, यापलीकडे कोणी काही करू शकत नाही” असे उर्मटपणाचे उत्तर त्या शिक्षिकेने दिल्याचे समजते. या उडवाउडवीच्या उत्तरामुळे पालकांची नाराजी आणखी तीव्र झाली आहे.ग्रामीण भागात आधीच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारी मराठी शाळांमधील शिक्षकांच्या शिकविण्याच्या अनास्थेपणामुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका अधिक वाढला असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. यावर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना एक पालक म्हणाले, “शिक्षक जबाबदारी घेत नसतील तर मुलांचं भविष्य कुणावर सोपवायचं? इंग्रजी शाळा महाग आहेत, पण किमान तिथे अभ्यास तरी होतो. ही परिस्थिती अशीच राहिली तर मराठी शाळा टिकणार नाहीत.” गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार ठरत असलेल्या त्या शिक्षिकेची लेखी तक्रार गटशिक्षण अधिकारी तसेच बीडीओ कार्यालयाकडे देण्यात आली आहे. पालकांनी शाळेची चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यावर ठोस निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांचे सामूहिक दाखले काढण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.