प्रभात वृत्तसेवा पाटस – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथे आमदार राहुल कुल यांनी आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून बस थांबा उभारले आहे. मात्र, बसथांबा याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक गाव नेत यांच्या दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून धूळखात पडले आहे. पुणे येथील स्वारगेट आणि शिवाजीनगर येथील बसस्थानकानंतर सोलापूर महामार्गावर थेट भिगवण येथेच बसस्थानक आहे. त्यामुळे पाटस येते बसस्थानक व्हावे अशी मागणी पाटस ग्रामस्थ करीत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्याने दहा वर्षांपूर्वी महामार्ग लगतची महसूल विभागाची सलग दीड ते दोन एकर जागा मोजणी करून राज्य परिवहन विभागाच्या ताब्यात दिली. मात्र, त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ती जागा पडून आहे. या जागेवर सध्या अतिक्रमण वाढत आहे. आमदार कुल यांनी पाटस परिसरातील प्रवासांची मागणी लक्षात घेता नियोजित बस स्थानकाच्या जागेवर आमदार विकास निधीतून बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारून बस थांबा उभारला आहे. मात्र, बसथांबा उभारल्यापासून दुर्लक्ष केले आहे. सध्या बसथांब्याच्या ठिकाणी गवत, काटेरी झाडांनी विळखा घातला आहे. मद्यपान करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. बसथांब्याचा शौचालयासाठीही वापर होत आहे. पुढील बाजूला इतर वाहने थांबत असल्याने हे वाहन तळ झाले आहे. परिणामी या ठिकाणी महामार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी भरती थांबत नाहीत. या ठिकाणी बस थांबण्यासाठी पुरेशी जागाही नाही. अशा जागेतच प्रवासी एसटी बसेसचे वाट बघत थांबवावे लागतात. ग्रामपंचायतीने आमदार राहुल कुल यांना शह देण्यासाठी राजकीय हेतूने बसथांब्याच्या २० मीटरच्या आत मिनी बस थांबा उभारला आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी बस उभी राहिली तर वाहनांची मोठी गर्दी होते. भविष्यात मोठा अपघात होऊन दुर्घटनेची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेशी जागा नसल्याने दुर्घटनेची भीती दरम्यान, आमदार कुल यांनी लाखो रुपये खर्चून बसथांबा उभारला आहे. मात्र, त्यालगतच अतिक्रमण होत आहेत. त्यामुळे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस थांबत देखील नाहीत. त्यामुळे प्रवासांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, आता हडपसर ते पाटस अशी पुणे महानगरपालिकेची पीएमटी बस लवकरच धावणार आहे. मात्र, ही बस थांबायला आणि उभी करायला या पुरेशी जागा नाही, ही बस वळवायला जागा नाही. ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाचा प्रश्न आणि प्रवाशांच्या समस्या दुर्लक्षितच राहिल्या आहेत.