प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – वाडागाव (ता. शिरूर) येथे एका युवतीला मोबाइलमधील फोटोंची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी धनंजय सुभाष शितोळे याच्याविरुद्ध अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि आरोपी धनंजय शितोळे यांची ओळख फुलगाव येथील एका कंपनीत नोकरी करत असताना झाली होती. यावेळी धनंजयने कंपनीच्या ऑफिसमध्ये युवतीसोबत काही फोटो काढले होते. या फोटोंचा वापर करून त्याने युवतीला वाडागाव येथील आपल्या घरी नेले आणि तिथे हे फोटो नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी त्याने युवतीवर बळजबरीने अत्याचार केला.अत्याचारानंतरही आरोपीने ही बाब कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची आणि मारहाण करण्याची धमकी युवतीला दिली होती. अखेर पीडित युवतीने धैर्याने शिक्रापूर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी धनंजय शितोळे याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करत आहेत.