प्रभात वृत्तसेवा ओतूर – संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सद्गुरू चैतन्य महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) व ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते या शिल्पाचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना ह.भ.प. माऊली महाराज कदम म्हणाले की, ओतूर ही अत्यंत पावन भूमी आहे. याच ठिकाणी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना राम कृष्ण हरी हा पवित्र मंत्र दिला, जो आज संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत या शिल्पांची उभारणी होणे ही स्तुत्य बाब आहे. ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांनी ओतूर परिसराचे सांप्रदायिक महत्त्व विशद करत या शिल्पकलेचे कौतुक केले. या सोहळ्यासोबतच दोन कोटी रुपये निधीतून उभारलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जलशुद्धीकरण प्रकल्पाचेही लोकार्पण करण्यात आले.यावेळी ह.भ.प. गंगाराम महाराज डुंबरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, सरपंच डॉ. छायाताई तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात, धनंजय डुंबरे, अनिल तांबे, विनायक तांबे, दिलीप डुंबरे, विशाल तांबे, वैभव तांबे, आशिष शहा, विजय कुऱ्हाडे, अक्षदा पानसरे, प्रांजल भाटे, गीता डुंबरे, सचिन घोलप, दत्तात्रय डुंबरे, सुदाम घोलप, रंगनाथ घोलप, स्वप्नील डुंबरे, शिवाजी अस्वार, अनिल डुंबरे आणि शिल्पकार यतीन शेटे यांच्यासह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.