प्रभात वृत्तसेवा ओतूर – सावित्रीबाई फुले यांनी जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांना सामोरे जात स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. आजच्या मुलींच्या आणि महिलांच्या जीवनातील हा सुवर्णकाळ सावित्रीबाईंनी केलेल्या त्यागाची परिणती आहे, त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात मुलींनी न्यूनगंड न बाळगता संकटांना धाडसाने सामोरे जावे, असे प्रतिपादन वाघिरे कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिंदे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय, ओतूर येथे आयोजित ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेत डॉ. निलेश काळे यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मुलींनी कोणत्याही संकटात न घाबरता सावध राहावे आणि गरज पडल्यास पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य सरकारने मुलींच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रशिक्षिका रागिणी बोराडे यांनी विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले आणि स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनी भाग्यश्री डुंबरे हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे, डॉ. वसंत गावडे, प्रा. श्वेताली कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नंदकिशोर उगले यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. विनायक कुंडलिक यांनी केले आणि आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र आंबवने यांनी मानले.